श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या सर्व योगपद्धती जसे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व इतर सर्व योगपद्धती स्वतःमध्ये विशेष व श्रेष्ठ आहेत. परंतु, पारिवारिक जीवनात त्या सर्व योगसाधनांची योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात व योग्य प्रक्रियेप्रमाणे साधना केल्यास श्रीमद्भगवद्गीतेतील व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग करण्याचा मार्ग पटकन सापडतो व त्याची वैयक्तिक, पारिवारिक, व्यावसायिक व सामाजिक जीवनात सुख, यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी उपयुक्तता समजते.
श्रीमद्भगवद्गीतेतील व्यावहारिक ज्ञान लक्षात येण्यासाठी आणि त्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी सर्व प्रथम या पुस्तकातील चित्रांचे व विविध मुद्यांचे अवलोकन करावे. ते केल्यानंतर आपल्याला आकर्षित करणाऱ्या मुद्यांपासून वाचन सुरू करावे. असे थोडे वाचन चालू झाल्यावर, वाचकाने भूमिका व प्रस्तावनेपासून परत वाचन सुरु करावे, व नंतर पुस्तकातील मुद्यांच्या नैसर्गिक क्रमाने एकापाठोपाठ एक बिंदू याप्रमाणे पृष्ठ ३३ पासून पुढे वाचन सुरु करावे. येणाऱ्या चित्रांच्या संदर्भानुसार भाग १ मधील मुख्य चित्रे पहावीत म्हणजे मुद्यांमधील विषय समजण्यास सोपे होईल.
भूमिका व प्रस्तावना वाचून झाल्यावर अनुक्रमणिका पाहून आपल्या आवडत्या मुद्यांपासून वाचन सुरु केल्यास पण सर्व आध्यात्मिक संकल्पना समजण्यास सोप्या होतील.
या 'राजयोग' पुस्तकातील तक्त्यांचे रोज नियमाने थोडे थोडे, स्टेप बाय स्टेप वाचन केल्यास, सर्व तक्ते समजून घेण्यास एकदम सोपे होतात. यासाठी या पुस्तकातील भाग ३, पृष्ठ ७६-८९ येथे सर्व चक्रांची माहिती मोठ्या अक्षरात दाखविली आहे ती पाहावी. या तक्त्यांमुळे श्रीमद्भगवद्गीतेतील व्यावहारिक ज्ञान सहजच उमजते व त्याची दैनंदिन जीवनात अनुभूती येण्यास सुरुवात होते. राजयोग साधना करतांना भाग १ मधील दिशा दर्शक तक्ता क्र.१ पृष्ठ १८ चा उपयोग करावा.
या पुस्तकातील आध्यात्मिक विषय व त्यांचा दैनंदिन जीवनाच्या संदर्भातील आशय / उपयुक्तता पटकन समजून येण्यासाठी पुस्तकाच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात ठेवलेले भाग ५, परिशिष्ट : पृष्ठ १२८ ते १५० व उपसंहारः पृष्ठ १५१ ते १६४ जरूर वाचावे.
श्रीमद्भगवद्गीतेतील विश्वरूपदर्शन योग या ११ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचे विश्वरूप परमात्मा स्वरूप प्रकट करून प्रत्येक व्यक्तीची इष्ट (उपास्य किंवा आराध्य) देवता, तसेच इतरांची इष्ट (उपास्य किंवा आराध्य) देवता व एकमेव ईश्वर, परमेश्वर किंवा भगवान यांच्यातील एकत्व स्पष्ट केले आहे. पुस्तकात या संकल्पनेतील ज्ञान व त्याची जाणीव तसेच त्यांची दैनंदिन जीवनात सुख व सर्वांगीण यश मिळविण्याच्या दृष्टीने असलेली उपयुक्तता स्पष्ट केलेली आहे. (भाग २, पॉईंट ३२ व ३४ पृष्ठ ४९ ते५२, भाग ३, पॉईंट ३० व ३१ पृष्ठ १०१ ते १०५)
श्रीमद्भगवद्गीतेतील 'ज्ञानविज्ञान योग' या ७ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अहंकार ही त्यांची भौतिक शक्ती आहे व ही अहंकाररूपी शक्तीच या भौतिक विश्वाच्या व मानवाच्या अस्तित्वाची मूलभूत शक्ती आहे असे स्पष्ट केले आहे. सर्व संतांनी या अहंकाररूपी शक्तीला मिथ्या अहंकार म्हणून संबोधिले आहे तसेच अहंकाररूपी शक्तीचे साधक व बाधक रूप स्पष्ट केले आहे. कारण सांसारिक जीवनात हमखास सुख व सर्वांगीण यश मिळविण्यास अहंकाररूपी शक्ती बेभरवशाची आहे. आजच्या युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर टेकनॉलॉजीवर आधारित वैज्ञानिक उपकरणे म्हणजे या विश्वाच्या अहंकाररूपी शक्तीचे प्रकटीकरणच आहे. विज्ञान या शक्तीचा वापर करत आहे, परंतु विज्ञानाला या शक्तीचे आकलन नाही. (भाग २, पॉईंट ३५, पृष्ठ ५२ ते ५६, भाग ३, पॉईंट ३२ ते ३६ पृष्ठ १०६ ते १०९).
या पुस्तकात अशा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअरवर आधारित उपकरणांच्या स्वरूपात दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या बेभरवशाच्या अहंकाररूपी शक्तीचे वैज्ञानिक स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच या अहंकाररूपी शक्तीचा वापर कसा करावा व स्वतःच्या इष्ट देवतेच्या शक्तीच्या पाठबळाचा उपयोग करून या अहंकाररूपी शक्तीच्याच उपयोगाने सांसारिक जीवनात हमखास सुख व सर्वांगीण यश कसे मिळवावे हे स्पष्ट केले आहे. (भाग ४, पृष्ठ ११३ ते १२७)
सर्व इष्ट (उपास्य, आराध्य) देवता व ईश्वर यांचे एकत्व सनातन धर्माच्या मूळ शिकवणुकीतील 'विविधतेतील एकता' या संकल्पनेचे आध्यात्मिक स्पष्टीकरण आहे. तसेच या विश्वाची अहंकाररूपी शक्ती म्हणजे या दिसणाऱ्या विश्वातील 'विविधतेतील एकता' या संकल्पनेचे भौतिक स्वरूप आहे.
वरील दोन्ही संकल्पना सनातन धर्माची प्रमुख अंगे आहेत व सांसारिक जीवनात त्यांची महत्त्वाची भूमिका असते.